आग्रा : कडक उन्हामुळे पर्यटकांचा कासावीस होऊन जीव गेला

आग्रा : रायगड माझा वृत्त

केरळमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी देशातील अनेक भागांत उन्हाने काहीली होत आहे. अनेक भागांत प्रचंड उकाडय़ाने विक्रम मोडले आहेत. याचा फटका लांब पल्ल्याच्या ट्रेन प्रवाशांना बसला आहे. या उकाडय़ाने केरळ एक्सप्रेसने प्रवास करत असलेल्या चार वृद्ध प्रवाशांचा जीव घेतला. ही घटना आग्रा ते झांसी दरम्यान घडली. हे प्रवासी आग्र्य़ाहून कोईमतूरला जात होते.

आग्रय़ाहून झांसीकडे निघताना गाडीला सिग्नल मिळाले नाही.त्यामुळे ट्रेन कडक उन्हात उभी करण्यात आली.कडक उन्हामुळे या पर्यटकांचा जीव कासावीस झाला. यातील पाच पर्यटकांची प्रकृती बिघडली.गाडी मध्येच थांबवून ठेवल्यामुळे या पर्यटकांवर उपचार करता आले नाहीत आणि त्यातील चौघांचा मृत्यू झाला.मृतदेह झांसी स्थानकांवर उतरवून त्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आली.

१० दिवसांपूर्वी तामीळनाडूतील ६८ पर्यटकांचा एक ग्रूप वाराणसी आणि आग्रा फिरायला आला होता. वाराणसी फिरल्यानंतर हे पर्यटक शनिवारी आग्रा येथे आले. काल ते आग्र्य़ाहून केरळ एक्सप्रेसने कोईम्बतूरला निघाले होते. त्यावेळी ही घटना घडली. पचय्या (वय८०), बालकृष्ण (वय६७), धनलक्ष्मी (वय७४) आणि सुभरय्या (वय७१) अशी मृतांची नावे आहेत.

सिग्नल न मिळाल्यामुळे कडक उन्हाचा त्रास होऊन चार पर्यटकांचा मृत्यू झाल्याचा आरोप रेल्वे प्रशासनाने फेटाळून लावला आहे. गाडीला तांत्रिक कारणांमुळे उशीर झाला असे कारण सांगत मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांची प्रकृती आधीच खराब असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण उघड होईल, असेही रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत