उदयनराजेंविरोधात शिवसेनाच लढणार-दिवाकर रावते

divakar rawte

सातारा : रायगड माझा वृत्त

सातारा लोकसभेची जागा शिवसेनेकडेच आहे. त्यामुळे छत्रपतींच्या विरोधात नव्हे तर आम्ही राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरोधात लढणार आहोत. आम्ही कोणाला ऑफर देत नाही. शिवसेनेच्या ध्येय-धोरणात जे बसते, त्याचाच आम्ही सन्मान करतो. आमचे धोरण वाल्याचा वाल्मीकी करण्याचे नाही, असे स्पष्ट मत परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी व्यक्त केले.

येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांनी आज त्यांच्याशी संवाद साधला. त्या वेळी सातारा लोकसभेच्या जागेविषयी काय सांगाल, असे विचारले असता मंत्री रावते म्हणाले, ‘साताऱ्याची जागा शिवसेनेकडेच राहणार असून आम्ही ती पूर्ण ताकदीने लढणार आहोत. लोकसभेत उमेदवार महत्त्वाचा नसतो. पक्ष लढतो आणि तोच महत्त्वाचा आहे.

साताऱ्याबाबत मी छत्रपतींना सह्याद्रीवर भेटलो होतो. त्यावेळी भाजपचे चार मंत्री त्यांना गराडा घालून उभे होते. छत्रपतींच्या विरोधात कोणीही उभे राहू नये. छत्रपतींचा घराण्याचा मान म्हणून साताऱ्याची ही एकमेव जागा असली पाहिजे. पण, पक्ष म्हणून उदयनराजे लढले तर त्या पक्षाच्या विरोधात आम्ही लढणार आहोत. राष्ट्रवादीला त्यांची ही जागा पक्की असल्याचे वाटते. त्यामुळे त्यांच्याविरोधात आम्ही लढणार आहोत.”

तुम्ही उदयनराजेंना ऑफर दिली होती का, यावर मंत्री रावते म्हणाले, ‘आम्ही कोणाला ऑफर देत नाही. शिवसेनेच्या ध्येय-धोरणात जे बसते, त्यांच्याशी आमचे जमते. गेल्यावेळी युतीमध्ये निर्णय झाल्यामुळे साताऱ्याची जागा रिपब्लिकन पक्षाला दिली होती. यावेळेस आम्ही साताऱ्यातून लढणार आहोत. रिपब्लिकन पक्षाकडे हा मतदारसंघ नाही.” या वेळेस छत्रपतींच्या वंशजांविरोधात शिवसेना उमेदवार देणार असल्याच्या प्रश्‍नावर रावते म्हणाले, ‘आम्ही छत्रपतींच्या विरोधात नव्हे तर पक्षाच्या विरोधात उमेदवार देत आहोत.”

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत