कला, साहित्य आण‍ि वैचार‍िक क्षेत्रातील महान व्यक्त‍िमत्त्वाचा अस्त

– मुख्यमंत्र्यांची गिरीश कर्नाड यांना श्रद्धांजली

 

  मुंबई:रायगड माझा वृत्त 

नामवंत अभिनेते-दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांच्या निधनाने साहित्य, कला आणि वैचारिक क्षेत्रातील एक महान व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

  मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, श्री. कर्नाड हे एक बहुपेडी व्यक्तिमत्त्व होते. साहित्य, चित्रपट, रंगभूमी यासह वैचारिक क्षेत्रातही त्यांचा समर्थ वावर होता. विशेषत: एक महान रंगकर्मी म्हणून त्यांचे भारतीय नाट्यक्षेत्रातील योगदान सदैव स्मरणीय असेल. ज्ञानपीठ, कालिदास सन्मान, साहित्य अकादमी, संगीत अकादमी यांच्यासह विविध प्रतिष्ठेचे पुरस्कार व नागरी सन्मानांनी झालेला गौरव हा त्यांच्या कार्याचे महत्त्व विशद करणारा आहे. ययाति, तुघलक, नागमंडल, हयवदन यासारखी नाटके आण‍ि उत्सव या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून त्यांची विशेष ओळख होती. भारतीय पौराणिक कथांना समकालीन प्रश्नांशी जोडत त्यावर भाष्य करणारे त्यांचे लेखन केवळ समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारे नव्हते तर ते विचार प्रवाहित करणारे होते. भारतीय नाट्यक्षेत्राची पुनर्रचना करणाऱ्यांमध्ये ते अग्रणी होते. ऑक्सफर्डसारख्या नामांकित विद्यापीठाचे स्कॉलर असलेल्या कर्नाड यांचा विविध सामाजिक विषयांचा मोठा अभ्यास होता.

            माथेरान येथे जन्मलेल्या कर्नाड यांचा महाराष्ट्राशी अनोखा ऋणानुबंध असल्याने मराठी चित्रपटसृष्टी-रंगभूमी तसेच साहित्य क्षेत्राशीही त्यांचा निकटचा संबंध होता. जब्बार पटेल दिग्दर्शित उंबरठा चित्रपटातील त्यांची भूमिका रसिकांच्या सदैव स्मरणात राहील.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत