चौपदरीकरणास विलंब आणि समांतर रस्त्यांचा अभाव यामुळे तरुणाचा बळी: जमावाचा रास्ता रोको

जळगाव : रायगड माझा वृत्त

चौपदरीकरणास विलंब व समांतर रस्त्यांचा अभाव यामुळे मृत्यूचा सापाळा होत असलेल्या जळगावातून गेलेल्या राष्ट्रीय महामागाने आज सकाळी पुन्हा एका उच्चशिक्षित व नुकत्याच नोकरीला लागलेल्या तरुणाचा बळी घेतला. घरातून नोकरीच्या ठीकाणी पायी जाणारा तरुण अजिंठा चौफुलीजवळ महामार्ग ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने त्याला चिरडले. सकाळी सव्वानऊ वाजता हा अपघात झाला. अपघातांनतर संतप्त जमावाने आंदोलन करीत सुमारे अर्धा तास महामार्ग रोखून धरला. महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्याने आश्वासन दिल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. गुफरान खान अफजलखान (वय २४, रा.सालारनगर) असं मृत तरुणाचं नाव आहे.सालार नगरात राहणारा गुरफान खान हा रायसोनी महाविद्यालयातून एमबीए झाला होता. नुकताच तो एमआयडीसीतील अस्टर होंडा या चारचाकीच्या शोरुममध्ये नोकरीला लागला होता. नोकरीच्या ठीकाणी तो दररोज पायी जायचा. आजही नेहमीप्रमाणे तो सकाळी ९ वाजता घरातून निघाला. महामार्गावरील हॉटल मानस समोरुन रस्ता ओलांडत असताना चौफुलीच्या दिशेने येणाऱ्या ट्रकने (ओडी ०२ एल ४८२६) त्याला धडक दिली. यात तो रस्त्यावर पडल्यानंतर ट्रक त्याच्या अंगावरून गेला. या अपघातात गफुरखान याचा जागेवरच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक छोटू मोहन बागवान (वय २८) याला नागरिकांनी पकडून चांगलाच चोप दिला. यावेळी त्याच्यासह क्लीनरला एमआयडीसी पोलिसांच्या हाती सोपवण्यात आलं.

संतप्त जमावाचा रास्तारोको 
युवकाच्या अपघाती मृत्यूनंतर परिसरातील नागरिक संतप्त झाले. अजिंठा चौफुलीवर दुपारी बारा वाजता त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. आजच्या आज गतिरोधक व समांतर रस्त्याचे काम सुरू झाले पाहिजे यासह सक्षम अधिकार्‍यांना भेटल्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा नागरिकांनी घेतला होता. अर्धा तासाच्या अवधीनंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभियंता विश्‍वंजय बागडकर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन रस्त्याची पाहणी केली. नागरिकांनी मागणी केलेल्या ठिकाणी गतिरोधक बसवण्यासंदर्भात तात्काळ प्रस्ताव पाठवणार तसेच चौपदरीकरणाच्या कामाला महिनाभरात सुरूवात होईल, असं आश्‍वासन त्यांनी नागरिकांना दिलं. पण दोन दिवसांत गतिरोधकाचं काम सुरू न झाल्यास पुन्हा रास्ता रोको आंदोलन करू, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

लग्नाच्या तयारीत असलेल्या कुटुंबीयांना धक्का 
गुरफान खान याचे वडील अजमलखान कादरखान हे आव्हाणे येथील शाळेत शिक्षक म्हणून नोकरीस आहेत. त्यांच्या पश्चात आई-वडील, साऊद व ओवेस असे दोन भाऊ व एक विवाहित बहिण असा परिवार आहे. उच्चशिक्षण शिक्षण घेवून गफुरखान नोकरीसही लागल्याने वर्षी त्याचं लग्न करण्याची तयारी कुटुंबीयांनी केली होती.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत