तालाठ्याच्या गैर वर्तणुकीमुळे आणि दुष्काळामुळे फिरवला डाळींबाच्या बागेवर जेसीबी

अहमदनगर : रायगड माझा वृत्त

अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यात पाणी नसल्या कारणाने डाळिंबाची बाग सुकल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्याने पावणे दोन एकर डाळिंब बागेवर जेसीबी फिरवल्याची घटना समोर आली आहे.तीव्र दुष्काळी परिस्थितीमुळे डाळिंबाच्या बागेवर पाने नाहीशी झाली होती. निव्वळ डाळिंबाच्या काड्याच शिल्लक राहिल्याने एक-एक डाळिंबाचे झाड जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त केले.केलवड येथील सुभाष चांगदेव वाघे या शेतकऱ्याने डाळिंबाची बाग नष्ट केली आहे.

सुभाष वाघे यांच्या नावावर ७५ गुंठे क्षेत्र आहे. जवळपास दोन एकर शेती त्यांच्या नावावर आहे. या क्षेत्रात त्यांनी २० गुंठ्यांवर शेततळे बनविले आहे. या वर्षी तीव्र दुष्काळी परिस्थिती असल्याने केलवड भागात पिण्यासाठीच पाणी नाही. मग बागेसाठी पाणी कुठून आणायचे, अशी भीषण परिस्थिती आहे. सुरुवातीला वाघे यांनी टँकरद्वारे पाणी विकत घेतले. त्यांनी तब्बल ६० हजार रुपये पाण्यावर  खर्च केले. दररोज चार वेळा टँकरद्वारे पाणी आणायचे. मात्र, पावसासाठी अजून महिनाभराचा अवधी आहे.

पाण्यासाठी इतका खर्च परवडत नसल्याने वाघे यांच्या अडचणी वाढल्या असून यात भर म्हणजे केलवड येथील तलाठी यांनी त्यांच्या शेतात डाळिंबाचा बाग असतानाही त्यांचे शेतात सोयाबिन दाखविले. त्यामुळे त्यांना डाळिंबाचे अनुदान न येता, सोयाबिनचे तुटपुंजे अनुदान आले. या दोन्ही कारणांमुळे  दोन एकर डाळिंबाच्या बागेवर जेसीबी फिरविल्याचे सुभाष वाघे यांनी सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत