पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, एलओसीवर व्यापार बंद

पुंछ: रायगड माझा वृत्त

दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानच्या कुरापती अजूनही थांबलेल्या नाहीत. पुंछ येथे पाकिस्तानने आज पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. नियंत्रण रेषेवरील (एलओसी) ट्रेड सेंटरवरच पाकिस्तानने शेल्सचा मारा केल्याने एलओसीवरील भारत-पाक दरम्यानचा व्यापार बंद करण्यात आला आहे.

बालाकोटमध्ये भारताने एअर स्ट्राइक केल्यानंतर नियंत्रण रेषेवर वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानने आज पुन्हा पुंछमध्ये गोळीबार करत शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. एवढेच नव्हे तर चक्का दा बाग येथे असलेल्या ट्रेड सेंटर या व्यापारी केंद्रावरही पाकने दोन शेल्सचा मारा केला. तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गोळीबारही केला. पाकिस्तानच्या या गोळीबाराला भारतीय लष्कराने सडेतोड उत्तर दिलं आहे. पाकिस्तानकडून झालेल्या या गोळीबारामुळे नियंत्रण रेषेवर तणावाची स्थिती निर्माण झाल्याने भारत-पाक दरम्यानचा व्यापार पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. या आधी पुलवामा हल्ल्यानंतर भारत-पाक दरम्यानचा व्यापार बंद ठेवण्यात आला होता.

भारताने बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक केल्यानंतर पाकिस्तानने पुंछ आणि राजौरीसहित नियंत्रण रेषेवरील अनेक सेक्टरमध्ये गोळीबार सुरूच ठेवला आहे. दुसरीकडे दहशतवाद्यांबरोबरही आज भारतीय जवानांची काश्मीर खोऱ्यात चकमक उडाली. त्यात एक जवान शहीद झाला आहे.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत