पोलिसांची पत्रकाराला मारहाण आणि गैर वर्तवणूक

उत्तर प्रदेश : रायगड माझा वृत्त

शामली शहरामध्ये धीमानपुरा फाटकाजवळ एका मालगाडीचे डबे घसरले. ही घटना घडत असताना मोठ्या स्फोटाचा आवाज परिसरातील लोकांनी ऐकल्याचे सांगितले जात आहे. मालगाडी घसरल्याचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला जीआरपीच्या पोलिसांनी बेदम मारहाण करत त्याच्यावर अमानुष अत्याचार केल्याची घटना एका व्हिडिओद्वारे पुढे आली आहे.

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार,  या पत्रकाराला शिव्या देत अमानुष मारहाण करतानाचा व्हिडिओही एएनआयने प्रसिद्ध केला आहे. या पोलिसांनी आपला कॅमेरा हिसकावून घेतला आणि नंतर आपल्या तोंडात मूत्रविसर्जन केल्याची संतापजनक माहितीही या पत्रकाराने दिली आहे. इतके सगळे झाल्यानंतर आपल्याला कैद करून ठेवण्यात आल्याचे पत्रकाराने सांगितले.

याबाबत परिसरातील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना घडली तेव्हा धीमनपुरा फाटक बंद होते. किर्र काळोख होता. अचानक स्फोटाचा आवाज ऐकू आल्यानंतर काहीतरी मोठी वस्तू घसरल्यासारखा आवाज झाला. आसपासचे लोक घाबरलेले होते. नेमके काय झाले हे कुणालाच कळेनासे झाले होते. काही वेळानंतर मालगाडीचे डबे घसरल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान, पत्रकाराला अमानुष मारहाण करत गैरवर्तन करणाऱ्या जीआरपीच्या ४ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये स्टेशन हाऊस अधिकारी राकेश कुमार आणि हवालदार सुनील कुमार यांचा समावेश आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत