फी वाढीविरोधात बहुजन विद्यार्थी संघटनेची केएमसी कॉलेजवर धडक

समाधान दिसले: खोपोली

फी वाढीविरोधात बहुजन विद्यार्थी संघटनेने आज केएमसी महाविद्यालयावर धडक दिली आहे. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महाविद्यालयाच्या प्रशासनाला धारेवर धरले. महाविद्यालयाच्या विकासनिधीकरिता महाविद्यालय विद्यार्थ्यांकडून ३००० रुपये अधिक घेत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली होती.

खालापूर शिक्षण प्रसारक मंडळ गेल्या काही वर्षापासून मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे. त्यामुळे यावर्षीपासून मंडळाने महाविद्यालयच्या विकासनिधीसाठी ३००० रुपये फी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या वाढीव फीचा परिणाम विद्यार्थी आणि पालक वर्गाला सहन करावा लागत आहे. मंडळाच्या या निर्णयाचा जाब विचारण्यासाठी आणि विद्यार्थ्यांची बाजू मांडण्यासाठी बहुजन विद्यार्थी संघटनेने आज केएमसी महाविद्यालयावर धडक दिली. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले.

यावेळी बहुजन विद्यार्थी संघटनेने महाविद्यालयाने विद्यार्थ्यांकडून घेतलेली फी पुन्हा परत करावी आणि नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडूनही ती घेण्यात येवू नये अशी मागणी त्यांनी महाविद्यालयाला केली आहे. अन्यथा संस्थेच्या विरोधात आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.

दरम्यान खालापूर शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष किशोर पाटील यांनी या फी वाढीबद्दल माहिती दिली. विद्याप्थाची मान्यता टिकविण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना विविध सुविधा देण्यासाठी हि फी आकारण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत