बेरोजगार तरुणांना विदेशातील नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळले

नवी मुंबई:रायगड माझा वृत्त

दुबईतील कंपनीत नोकरीला लावण्याचे प्रलोभन दाखवून एका टोळीने बेरोजगार तरुणांकडून लाखो रुपये उकळून पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात फसवणूक झालेल्या 68 तरुणांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. फसवणूक झालेल्यांची संख्या यापेक्षा मोठी असण्याची शक्‍यता आहे. कोपरखैरणे पोलिस ठाण्यात या टोळीतील चार जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने याप्रकरणी तपासाला सुरुवात केली आहे.

या टोळीने दीड वर्षापूर्वी घणसोली सेक्‍टर-4 मधील गॅलेक्‍सी वर्ल्ड इमारतीत आपले कार्यालय थाटले होते. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून दुबईतील कंपनीत नोकरीला लावण्याबाबतची जाहिरात केली होती. या टोळीने प्रत्येक तरुणाकडून 50 हजारांपासून ते 4 लाख रुपयांपर्यंत रोख रक्कम उकळली.

दरम्यान, पैसे घेतल्यानंतरही नोकरी न मिळाल्याने तरुणांकडून विचारणा होऊ लागली. या टोळीने वेगवेगळी कारणे सांगून वेळ मारून नेण्यास सुरुवात केली. त्यानंतर कार्यालय बंद करून टोळीने पलायन केले. त्यानंतर या तरुणांनी कोपरखैरणे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार चार जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक गंगाधर देवडे यांनी दिली.

याप्रकरणी समीर खान ऊर्फ साजिद अली खान, शबाना सरदार, जयेश गोगरी आणि शाकिर शेख या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच,दुबईत नोकरीसाठी मुले मिळवून दिल्यास प्रत्येक मुलामागे कमिशन देण्याचेही प्रलोभन या टोळीने दाखवले. त्यामुळे पश्‍चिम बंगाल येथील अब्दुल हमीद मंडोल याने 24 मुलांकडून नोकरीसाठी कागदपत्रे; तसेच 8 लाख 40 हजार रुपये घेऊन ही रक्कम आणि कागदपत्रे या टोळीच्या घणसोलीतील कार्यालयात दिली. अब्दुलप्रमाणेच गुलाम अन्सारी यानेही 42 मुलांकडून 14 लाख 70 हजार रुपये व कागदपत्रे घेऊन ती या टोळीकडे दिली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत