मी अपयशी ठरलोय ना, मग माझ्याविरोधात महाआघाडी का करता?- मोदी

why opposition forming alliance of narendra modi is failure pm asks in tamilnadu | मी अपयशी ठरलोय ना, मग माझ्याविरोधात महाआघाडी का करता?- मोदी 

तिरुपूर: रायगड माझा वृत्त

विरोधकांच्या वाढत्या जवळिकीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा निशाणा साधला. मी पंतप्रधान म्हणून अपयशी ठरलो असं म्हणता, मग माझ्याविरोधात आघाडी करण्याची गरज का भासते, असा सवाल मोदींनी विरोधकांना विचारला. ते तामिळनाडूतील तिरुपूरमध्ये बोलत होते. यावेळी मोदींनी काँग्रेससह, द्रमुकवर जोरदार टीका केली. मात्र त्यांनी राज्यातील सत्ताधारी अण्णाद्रमुकवर टीका न करता दक्षिणेत मित्र जोडण्याचा पर्याय खुला ठेवला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरील मोदींचा तामिळनाडू दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. मोदींनी जनसभा घेतलेल्या तिरुपूरमध्ये उत्तर भारतीयांचं प्रमाण मोठं आहे. मोदींच्या दौऱ्याचा, त्यांच्या सभेचा फायदा भाजपाला तिरुपूरसह आसपासच्या भागात होऊ शकतो. मोदींच्या सभेला तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई पलानीस्वामी उपस्थित होते. यावेळी दोघांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यातील अनेक प्रकल्पांचं भूमिपूजन केलं. यानंतर हे दोन्ही नेते कोईम्बतूर विमानतळावरही भेटले. त्यामुळे येत्या निवडणुकीत भाजपा आणि अण्णाद्रमुकमध्ये आघाडी होण्याची शक्यता वाढली आहे.

तिरुपूरमधील सभेत मोदींनी विरोधकांच्या एकीवर घणाघाती हल्ला केला. पंतप्रधान अपयशी ठरले, असं विरोधक म्हणतात. मग त्यांना महाआघाडी करण्याची गरज का वाटते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. महाआघाडी म्हणजे महाभेसळ असल्याचा पुनरुच्चार मोदींनी केला. घराणेशाही पुढे नेण्यासाठीच महाआघाडी केली जात आहे. त्यांचा प्रयत्न तामिळनाडूसह देशातील जनता यशस्वी होऊ देणार नाही, असंही ते म्हणाले.

राफेल डीलवरुन वारंवार लक्ष्य करणाऱ्या काँग्रेसवर मोदींनी कडाडून टीका केली. संरक्षण क्षेत्रात काँग्रेसनं अनेक घोटाळे केले. मात्र भाजपानं भ्रष्टाचारमुक्त कारभार केला. संरक्षण क्षेत्राचा वापर काँग्रेसनं कायम त्यांच्या निकटवर्तीयांना कंत्राटं देण्यासाठी केला. जमिनीपासून आकाशापर्यंत त्यांनी भ्रष्टाचार केले. काँग्रेसच्या याच भ्रष्टाचारी वृत्तीचा परिणाम देशाच्या संरक्षण सिद्धतेवर झाला. संरक्षण दलांच्या आधुनिकीकरणाला खीळ बसली, असा आरोप मोदींनी केला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत