राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी जनतेची फसवणूक करून स्वतःची उन्नती केली-रवींद्र चव्हाण

खोपोली : रायगड माझा वृत्त
देश सुरक्षित ठेवण्यासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी एनडीए सरकारची आवश्यकता आहे. महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादीने पंधरा वर्षे सत्ता भोगत असताना अनेक घोटाळे केले. घोटाळे करून राष्ट्रवादीच्या  मंत्र्यांनी स्वतःची उन्नती केली, मात्र जनतेची फसवणूक करून विकास केला नाही. जनतेला मोदींवर विश्वास आहे आणि हाच विश्वास सार्थ ठरविण्यासाठी महायुतीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कोणाच्याही आदेशाची वाट न पाहता झोकून देऊन श्रीरंग बारणे यांचा प्रचार करावा, असे आवाहन रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मोदी सरकारच्या विविध विकास योजना, विकास कामांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवा असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जोरदार हल्लाबोल करून सेनेला विजयी करण्याचे आवाहन केले. या देशातील मतदारांचे देशावर प्रेम आहे अशा मतदारांना भेटून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना मतदान करण्यास सांगा, असे चव्हाण म्हणाले.
खोपोली शहरात शिवसेना-भाजपा-रिपाइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडले त्यावेळी चव्हाण बोलत होते. महाराजा मंगल कार्यालयात पार पडलेल्या महायुतीच्या पदाधिकारी मेळाव्याला भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार देवेंद्र साटम, सेना उपजिल्हा प्रमुख महेंद्रशेठ थोरवे, सेना सहसंपर्क प्रमुख विजय पाटील, भाजप तालुकाध्यक्ष बापू घारे, सेना शहर प्रमुख सुनील पाटील, भाजप शहर अध्यक्ष श्रीकांत पुरी, जिल्हा चिटणीस शरद कदम, तालुका चिटणीस सनी यादव, उपनगराध्यक्ष राजू गायकवाड, विनोद साबळे, नगरसेवक तुकाराम साबळे यांसह भाजपा रिपाइं सेना महिला आघाडीच्या पदाधिकारी, सर्व नगरसेवक आवर्जून उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करताना खासदार श्रीरंग बारणे यांनी संसदेत केलेल्या कामांची माहिती दिली व बारणे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत