सर्वांचा हिशोब होणार; पक्षांतर्गत विरोधकांना बारणेंचा इशारा

कर्जत : अजय गायकवाड

मावळ लोकसभा मतदारसंघातील खासदार श्रीरंग बारणे यांचा कर्जतमधील विजयी मेळावा त्यांच्या भाषणाने गाजला. निवडणुकीत पक्षविरोधी काम करणाऱ्या अनेकांचा बारणे यांनी आपल्या भाषणात समाचार घेतला आहे. त्यामुळे निवडणुकीत पक्षविरोधी काम करणाऱ्यांचा आता हिशोब होणार असा इशारा त्यांनी आपल्या भाषणातून दिला आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार यांचा दणदणीत पराभव केला. यानिमित्ताने कर्जत मधील महायुतीच्या वतीने त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या मेळव्यात बोलताना बारणे यांनी आपले भाषण अत्यंत आत्मविश्वासपूर्वक केले.

बारणे यांना मावळ मतदारसंघातील सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळाली आहे. २०१४ च्या निवडणुकीत तुलनेत २७ हजार पेक्षा अधिक मतांची आघाडी देणाऱ्या कर्जत मतदारसंघात यावेळी पिछाडी मिळाली आहे. पंचवीस कोटी खासदार निधीपैकी ८ कोटी निधी कर्जत मतदारसंघात देऊनही अपेक्षित मते न मिळाल्याने खासदारांनी अनेकांचा समाचार घेतला.

पवारांचा पराभव होऊ शकत नाही असे वाटल्याने शिवसेनेतील अनेकांनी रणांगणातून पळ काढला. आणि या निवडणुकीत आपल्यातील कोणाकोणाला किती आणि कायकाय मिळाले याची माहिती आपल्याकडे आहे आणि तसा अहवाल देखील आपण पक्षप्रमुखांकडे दिल्याचे बारणे यांनी सांगितले.

शिवसेना भाजप युतीच्या सामान्य कार्यकर्त्यानी निष्ठेने काम केले असताना काहींनी चुकीचे काम केले, मात्र त्यांना सुधारण्याचे काम पक्षप्रमुख करतील असा इशारा देखील त्यांनी पक्षांतर्गत विरोधकांना दिला.

एकूणच या विजयी मेळ्यातील भाषणात खासदार श्रीरंग बारणे यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली असली तरी त्यांच्या या भाषणामुळे शिवसनेतील अनेक इच्छुकांचे धाबे दणाणले आहेत.

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत