सीआरपीएफची सुरक्षा नसती तर जिवंत बाहेर पडलो नसतो ; शहा

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त 

मंगळवारी कोलकातामध्ये अमित शहा यांचा रोड शो होता. यावेळी प्रचंड हिंसा घडली. त्यापार्श्वभूमीवर अमित शहा यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. पश्चिम बंगालमध्ये सहा टप्प्यात मतदान पार पडलं. प्रत्येकवेळी पश्चिम बंगालमध्ये हिंसा उसळली. इतर राज्यात कुठेही हिंसक घटना घडल्या नाहीत. याचाच अर्थ पश्चिम बंगालमधील हिंसेला भाजप नव्हे तर तृणमूलच जबाबदार आहे, असं सांगतानाच कालच्या आमच्या रॅलीतील पोस्टर काढण्यात आले. आमच्या कार्यकर्त्यांना भडकावण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली होती, असा आरोप शहा यांनी केला. ममता बॅनर्जी यांनी भाजप आणि माझ्यावर एफआयआर दाखल करण्याची धमकी दिली आहे. आम्ही ममता दीदींच्या धमकीला भीक घालत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

कालच्या रॅलीत एक नव्हे तर तीन हल्ले झाले. तिसऱ्या हल्ल्यात जाळपोळ करण्यात आली. केरोसीन बॉम्ब फेकण्यात आले. दगडफेक करण्यात आली. काल जर सीआरपीएफची सुरक्षा नसती तर कोलकात्यातून जिवंत बाहेर पडता आलं नसतं, असंही त्यांनी सांगितलं. तसेच ईश्वरचंद विद्यासागर यांच्या फोटो भाजपने फोडल्याचा तृणमूलचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला. आम्ही रस्त्याच्या बाहेर होतो. कॉलेजच्या आत गेलोच नाही, मग आम्ही फोटो फोडण्याचा प्रश्न येतोच कुठे? तृणमूलच्याच कार्यकर्त्यांनी हा फोटो फोडल्याचं त्यांनी सांगितलं.

पश्चिम बंगालमध्ये मंगळवारी रोड शो दरम्यान झालेल्या हिंसाचाराला भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी तृणमूल काँग्रेसला जबाबदार धरलं आहे. सीआरपीएफची सुरक्षा नसती तर कोलकात्यातून जिवंत बाहेर पडलो नसतो, असं त्यांनी सांगितलं. तसेच तृणमूलच्या कार्यकर्त्यांनीच पंडित ईश्वरचंद विद्यासागर यांचा फोटो फोडल्याचा आरोपही त्यांनी केला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत