स्वराली ठरली ‘सूर नवा ध्यास नवा’ची विजेती

मुंबई : रायगड माझा वृत्त 

या चिमुकल्यांच्या गाण्यांनी अवघ्या महाराष्ट्राला मंत्रमुग्ध केले, त्यांच्या निरागस सुरांना संपूर्ण महाराष्ट्राने पसंती दिली, त्यांनी विविध शैलींची गाणी अत्यंत सहजतेने सादर करून महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांची मन जिंकली… पण, अंतिम सहा स्पर्धकांच्या अटीतटीच्या सुरांच्या खेळीत बाजी मारली ती स्वराली जाधव हिने. आपल्या मंत्रमुग्ध आवाजाने स्वरालीने ‘सूर नवा ध्यास नवा छोटे सूरवीर’चे मानाचे विजेतेपद मिळवले आहे. नुकताच या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा मुंबईत रंगला होता. या महाअंतिम सोहळ्यामध्ये स्पर्धकांमध्ये रंगलेल्या गाण्यांच्या मैफलत बाजी मारत छोटा सूरवीर ठरलेल्या स्वराली हिला गानसम्राज्ञी आशा भोसले यांच्या हस्ते सुवर्णकट्यार प्रदान करण्यात आली.

‘सूर नवा ध्यास नवा… छोटे सूरवीर’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. या कार्यक्रमातील सुरेल गाण्यांनी प्रेक्षकांचा आनंद द्विगुणित केला. स्वराली जाधव, मीरा निलाखे, सई जोशी, उत्कर्ष वानखेडे, चैतन्य देवढे आणि अंशिका चोणकर अशी सहा छोट्या सूरवीरांची फळी अंतिम फेरीत दाखल झाली होती. सुरांच्या सहाय्याने केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गानसम्राज्ञी आशा भोसले यांचा आशीर्वाद छोट्या सूरवीरांना लाभला. सोबतच परीक्षक गायक महेश काळे, अवधूत गुप्ते आणि शाल्मली खोलगडे यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. संपूर्ण कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी लीलया सांभाळलेल्या अभिनेत्री स्पृहा जोशी हिचे मनोरंजनविश्वात कौतुक होत आहे. ‘सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर’चे हे पर्व संपले असले लवकरच सुरेल गाण्यांची मैफल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे सांगण्यात आले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत