स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा युतीची साथ सोडून आघाडीशी मैत्री करण्याचा निर्णय; आघाडीकडे दोन जागांची मागणी

मुंबई : रायगड माझा वृत्त

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एनडीएचा मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजप–शिवसेनेची साथ सोडून आघाडीशी मैत्री करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेताना स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आघाडीकडे किमान दोन जागांची मागणी केली आहे.

गेल्‍या निवडणुकीत भाजपसोबत युती केल्‍यानंतर त्‍यांनी आम्‍हाला ३ जागा दिल्‍या होत्‍या. आता काँग्रेस-राष्‍ट्रवादीसोबत आघाडी करण्यासाठी त्‍यांनी आम्‍हाला किमान दोन तरी जागा द्याव्यात, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे. दरम्‍यान, असे झाले नाही आणि काँग्रेस-राष्‍ट्रवादीसोबत गेलो नाही तरीही भाजपसोबत जाणार नाही, असेही शेट्टी यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

शिवसेना–भाजप युतीने मित्र पक्षांची दखल न घेतल्याने राजू शेट्टी नाराज झाले आहेत. त्‍यामुळे त्‍यांनी आता आघाडीशी जवळीक केली असून, आज जागा वाटपावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.

जागावाटपासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मध्यस्थीने काँग्रेसचे नेते अहमद पटेल आणि राजू शेट्टी यांची फोनवरून चर्चा झाली. यावेळी काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटनेला वर्धा किंवा सांगलीची जागा देण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून हातकणंगले येथे राजू शेट्टी तर काँग्रेसकडून आणखी एक जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिली जाण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत